अशी पाखरे येती
आजकाल
टू व्हिलर गाडयांचे अपघात खूप वाढले आहेत.त्या अपघातांतील मृत्यूंचे किती खोलवर परीणाम होतात.हे सांगणे कठीण आहे.या
अपघातांत कानात वारे शिरलेले तरूण जास्त असतात.त्यांना
वेगामधला थरार रोमांचक वाटतो.तो थरार त्यांनी अनूभवलेला असतो.परंतु त्यांनी ऐन तारूण्यातील
मुलगा वारलेल्या आई-वडिलांचे खचलेले चेहरे पाहिले असतात का?
असा प्रश्न पडतो.किती खोलवर असतात त्यांच्या वेदना!आपले आयुष्य इतके
साधे आणि स्वस्त आहे का?असा विचार डोक्यात येतो.आयुष्यात केवळ कुटुंबासाठीच नव्हे
तर समाजासाठीही करण्यासारखे भरपूर काही असते.या बाबींचा ही तरूणाई विचार करणार की नाही?
बीए
दोनमध्ये शिकणा-या माझ्या रोहीत या विद्यार्थ्याचा
टू व्हिलरवरून जाताना रविवारी रात्री भयंकर अपघात झाला. अज्ञात वहानाने ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाला.अनेक वर्षांच्या प्राध्यापकीनंतर
मलाही आयुष्याचे महत्त्व तरूणांना पटवून देण्यात आपण कमी पडतो की काय?असे वाटू लागले. ही बातमी सोमवारी सकाळी स्टाफरूमध्ये वर्तमानपत्रात पहिल्या
पानावर वाचली.विश्वास बसेना.सुन्न झालो.शांतपणे बाहेर पडलो.काही उत्साही मुलं श्रध्दांजलीचा
फलक लिहीत होती.मला वाटलं यातली किती मुलं व बातमी वाचणारे किती लोक गाडी चालवताना प्रत्येक क्षणी या भयंकर अपघाताची
जाणीव ठेवतील?का हळूहळू सगळं विसरून पुन्हा कुठेतरी असीच हृदयद्रावक
घटना घडल्याचे वाचावे लगणार.भांडवलशाही व्यवस्थेत आपल्या संवेदना किती बोथट झाल्या
आहेत.सगळं कसं आपण पटकन विसरू लागलो आहोत.
त्या दिवशी मला पुढचे तास घेणे अवघड
झाले.त्याचा हसरा उत्साही चेहरा समोरून हटत नव्हता.माझ्याशी तर तो आदराणे वागायचाच.पण
महाविद्यालयातील सर्वांचाच तो आवडता होता.प्राध्यापकांच्यात तर त्याच्या चांगुलपणाच्या
चर्चा होत्याच.पण काही दिवसांनीही त्याचे मित्र
तो नसल्याने वर्गात बसू वाटत नसल्याचे मला म्हणाले.
तारूण्याच्या
ऐन उंबरठयावर वयाच्या नुकत्या विसीमध्ये तो गेला.अत्यंत हृदयद्रावक घटना.तो आजपासून
दिसणार नाही.एक आवडता विदयार्थी गेल्याचे दुःख खुप खोल व कायमचा घाव घालणारे होते.
शनिवारचा माझा हा त्याच्या आयुष्यातील शेवटचा तास ठरला.मुलांनी मला सांगीतले की तो
'एकटा असलो तरी सरांच्या तासाला बसणार' असे म्हणायचा.सतत
वेगवेगळया कारणांनी त्याची आठवण येते.त्याच्याबद्दल बोलताना शब्द अपुरे पडतात.रेव्हरण
टिळकांनी एके ठिकाणी म्हटलय
''अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन
दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती.''
तो वैयक्तिक कामांसाठी कॉलेजमध्ये कधीही त्रास
देत नव्हता.वेळ घेऊन घरी यायचा. त्याने अनेकदा
त्याच्या घरी बोलवले होते.परंतु त्याच्याकडे जाणे जमले नव्हते.दुर्देवाने त्याच्या
मृत्यूनंतर त्याच्या घरी जाण्याचा दिवस पहावा
लागला.त्याचे घर पाहिल्यावर चांगल्या आर्थिक परिस्थितीची कल्पना आली.मला एक बाब प्राकर्षाने
जाणवली की त्याला श्रीमंतीची कसलीही मस्ती नव्हती.खरं तर एैश्वर्य आणि नम्रता या अपवादानेच
एकत्र आढळणा-या गोष्टी त्याच्याकडे होत्या.
एखादया पित्याला आपल्या तरूण मुलाच्या प्रेताला
खांदा दयावा लागणं ही अत्यंत हृदयद्रावक घटना असते असे म्हणतात.ते काय असते.याची प्रचिती
आली. त्याचे वडील अश्रू आवरू शकत नव्हते.त्यांचा
चेहरा पहाणे अवघड होते. त्यांच्या भेटीचा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा होता.
सर्वच वहानचालकांनी आपली आयुष्ये कुणाकुणाशी जोडलेली असतात.याचा विचार करून
काळजीपूर्वक वहाने चालवावीत.हीच अपेक्षा!
प्रा.लक्ष्मण
शिंदे
रयत शिक्षण संस्थेचे,
एएससी कॉलेज रामानंदनगर(बुर्ली)ता.पलूस,जि.सांगली.